अक्कलकोट प्रतिनीधी :- गौतम बाळशंकर
दि . १२ : दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवून सत्ता काबीज केली आहे. मात्र आता त्याच निवडणुकीतील एका घटनेवरून दुधनी शहर भाजपमध्ये राजीनामा नाट्य पहायला मिळत आहे. युवा नेते बसवराज हौदे यांनी भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष पदाचा राजीनामा पक्ष नेतृत्वाकडे पाठविले आहे. दुधनी बाजार समितीच्या निवडणुकीत म्हेत्रे यांना मदत केल्याचा आरोप भाजपमधील काही नेते मंडळींनी केली आहे. या कारणामुळे हौदे यांनी आपला राजीनामा अक्कलकोट तालुक्याचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे पत्राद्वारे पाठविले आहे यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे.
हौदे यांनी आमदार कल्याणशेट्टी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपल्याच पक्षातील काही सदस्यांनी स्वतःच्या स्वार्थ साधण्यासाठी बिनबुडाचे आरोप केले आहेत. एकेकाळी दुधनीत मोजकेच नेत्यानी भाजप पक्ष वाढीसाठी काम केले त्या नेत्यांमध्ये माझ्या वडील देखील होते. त्यांनी दुधनी शहरात पक्ष टिकून राहण्यास मोठ – मोठ्या संकटाना तोंड देत पक्षाने दिलेले काम चोख पद्धतीने केली. साटलोटीचे राजकारण आपल्या रक्तात आलेलं नाही. वडिलांच्या निधनानंतर अलिकडच्या २० वर्षात कोणाच्या दारात तुकड्यासाठी भटकंती केली नाही. जर बाजार समितीच्या निवडणुकीत माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना मदत करायचं होते तर मी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी सोसायटी मतदारांना तुमकुर येथे ठेवलेल्या मतदारांच्या संपर्कात मी स्वतः दुरध्वनीवरुन संपर्क साधून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना नंबर दिले नसते.अशा बिनबुडाचे आरोप करणाऱ्या स्थानिक काही मंडळींना कंटाळून मी पदाचा राजीनामा दिला आहे.
चौकट: केवळ स्वतःच्या पोळी भाजून घेण्यासाठी काही मंडळी बदनाम करत फिरत आहेत. पक्ष वाढीसाठी राजकारण करत नसुन पैशासाठी राजकारण करत आहेत. हे पक्ष श्रेष्ठींना सुध्दा चांगलं माहीत आहे.
दुधनी शहर भाजपमध्ये आज काल आलेल्या आयारामांना अधिक महत्व दिले जात आहे. यामुळे अनेक निष्ठावंत जुने कार्यकर्ते आज रोजी बाजुला गेले आहेत. पक्ष नेतृत्वाने याचे दखल घ्यावा आणि विचार करावा
बसवराज हौदे