माऊली शिक्षण संस्थेत जिजाऊ सावित्री विवेकानंद संयुक्त जयंतीनिमित्त विविध स्पर्धात्मक व समाज उपयोगी उपक्रम

बेंबळे /प्रतिनिधी :दत्तात्रय सुरवसे

लक्ष्मी आनंद विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेज टेंभुर्णी येथे राजमाता जिजाऊ सावित्रीबाई व स्वामी विवेकानंद यांचा संयुक्त जयंती उत्सव सोहळा संपन्न झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन व जिजाऊ वंदनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. शौर्य गीत व सावित्री वंदन गीत याद्वारे महानायकांना अभिवादन करण्यात आले.
सदर कार्यक्रमादरम्यान प्रशालेच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण संपन्न झाले. यामध्ये मिस मॅच डे, बॉलिवूड डे, पारंपारिक वेशभूषा सादरीकरण स्पर्धा, वाद विवाद स्पर्धा व जिजाऊ सावित्री चरित्र सामान्य ज्ञान स्पर्धा अशा स्पर्धात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या शुभहस्ते प्रशस्तीपत्रक शालेय साहित्य उपयोगी वस्तूने विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. यादरम्यान अनेक लहान मोठ्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगत आतून महानायकांना अभिवादन केले. तसेच परिसरातील उसतोड कामगारांना महावस्रदान हा सामाजिक उपक्रमही घेण्यात आला.
सदर कार्यक्रमाप्रसंगी सदिच्छा देताना सुरजा बोबडे मॅडम म्हणाल्या की, “चिमुकल्यांची भाषणे ऐकून मी भाऊक झाले. हृदयस्पर्शी भाषणांमधून विचार करायला भाग पाडणारे परखड सवाल मुलांनी मांडले. जिजाऊ सावित्री विवेकानंद यांच्या चरित्रातून समाजाला दिशा देण्याचे काम करा असे सांगायची गरज नाही हे आपल्या प्रशालेतूनच सुरू आहे याचा मला सार्थ अभिमान आहे.”
सदर कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष योगेश बोबडे, सचिवा सुरज बोबडे मॅडम, जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व पदाधिकारी, प्राचार्य विकास करळे सर, पीआरओ सागर खुळे सर, इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.