उजनीच्या पाण्यावाचून सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या खाईत लोटला जाणार, दशरथआण्णा कांबळे

करमाळा- (सिध्दार्थ वाघमारे)
सोलापूर जिल्ह्यामध्ये स्थित असलेल्या उजनी धरणाच्या पाण्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे, सध्या संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये काही दिवसातच मोठा दुष्काळ पडण्याचे चित्र निर्माण झालेले आहे. या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी योग्य ती पावले उचलून, उजनी धरणातून सध्या नदीमध्ये सोडण्यात येत असलेला प्रवाह त्वरित बंद करावा. त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यामध्ये असणाऱ्या धरणांमधून उजनी धरणामध्ये पाणी सोडावे. अशा प्रकारची मागणी शेतकरी कामगार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष दशरथअण्णा कांबळे यांनी केलेली आहे.
यावेळी पुढे बोलताना कांबळे म्हणाले की, उजनी धरणाच्या निर्मितीसाठी देशभक्त नामदेवराव जगताप यांनी मोठे शर्थीचे प्रयत्न केले होते. जे धरण दौंडमध्ये होणार होते. ते सोलापूर जिल्ह्यामध्ये आणण्यासाठी देशभक्त नामदेवराव जगताप यांचेच मोठे योगदान आहे. व ९ जानेवारी रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त उजनी धरणाच्या पाण्यासाठी सर्वांनी शर्थीचे प्रयत्न करुन त्यांना आदरांजली देऊ. या अनुषंगाने उजनी धरणामध्ये करमाळा तालुक्यातील 26 गावे गेली आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने धरणाच्या निर्मितीसाठी तालुक्याचे मोठे योगदान आहे. आणि हाच तालुका ‘धरण उशाला अन् कोरड घशाला’ अशा अवस्थेमध्ये आल्याचे चित्र निर्माण होत आहे. आता कुठे शेतकऱ्यांची पिके बहरू लागलेली आहेत. व काही दिवसातच शेतकरी या पिकातून मोठे उत्पन्न घेण्याच्या तयारीत आहे. परंतु उजनी धरण 60% च भरले होते. अशा परिस्थितीत पाण्याचे योग्य नियोजन होणे खूप गरजेचे होते. परंतु ते योग्य नियोजन न झाल्यामुळे, आता धरणामध्ये १०% पर्यंत ही पाणी पातळी खालावली आहे. व येत्या काही दिवसांमध्येच उजनी धरण मायनस मध्ये जाण्याची आता भीती व्यक्त केली जात आहे. या सर्व बाबींचा सारासार विचार केला असता संपूर्ण सोलापूर जिल्हा, मराठवाडा, पुणे जिल्हा, उस्मानाबाद जिल्हा, व पश्चिम महाराष्ट्र या सर्वांसाठी वरदायिनी ठरत असलेल्या व त्यातही या सर्वांमध्ये आघाडीवर असलेले बारामती शहर या शहरामध्ये पवार घराण्याने मोठमोठ्या कंपन्या आणून येथे उद्योगांना मोठी चालना दिलेली आहे. परंतु ह्या उद्योगांसाठी पाणीपुरवठा हे उजनी धरणच करते हे पवारांनी विसरू नये. त्यामुळे बारामतीचा जेवढा तुम्ही सहज आणि तत्परतेने विचार करता तेवढाच शेतकऱ्यांचा सुद्धा विचार करावा. अशा प्रकारची विनंती यावेळी कांबळे यांनी केलेली आहे. धरणातच जर पुरेसा पाणीसाठा राहिला नाही तर सर्वत्र दुष्काळाचे दाट सावट पसरले जाणार यात शंकाच नाही. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील आजी-माजी राजकिय नेत्यानी त्यांची राजकिय ताकद वापरुन उजनी धरणात पाणी आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे स्थित असलेल्या धरणांमधील पाणी उजनी धरणात सोडून धरण 50% भरून द्यावे. तरच येथील संकट टळले जाईल. अशा प्रकारची भीती दशरथअण्णा कांबळे यांनी व्यक्त केलेली आहे. तर येत्या दोन दिवसांमध्ये सिंचन भवन पुणे येथील आंदोलनाचे निवेदन देणार असल्याचे हि कांबळे यांनी सांगितले आहे.

सध्या उजनी धरणावर मराठवाड्याचा काही भाग, पुण्याचा काही भाग, संपूर्ण सोलापूर जिल्हा, उस्मानाबाद व खऱ्या अर्थाने पश्चिम महाराष्ट्र उजनी धरणामुळे, आर्थिक संपन्नता व स्थैर्यता शेतकऱ्यांना प्राप्त झालेली आहे. त्यामुळे उजनी धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा असणे गरजेचे आहे. अन्यथा पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा प्रत्येकाला भटकंती करावी लागणार हे हळूहळू चित्र आता स्पष्ट होत आहे. ज्याप्रकारे राजकारणी सत्तेसाठी एकमेकांसोबत भांडतात, त्याप्रमाणे त्यांनी शेतकऱ्यांसाठी सुद्धा कधीतरी भांडावे. फक्त आम्ही शेतकऱ्यांचीच लेकरे आहोत असे म्हणण्यापेक्षा त्यांच्यासाठी कार्य करावे. अन्यथा येत्या काही दिवसामध्ये सर्व शेतकरी व समविचारी संघटना घेऊन, आम्ही सिंचन भवन पुणे येथे उजनी धरणाच्या पाण्यासाठी आंदोलन करणार आहोत.

दशरथआण्णा कांबळे,
शेतकरी कामगार संघर्ष समिती