११०% च्या पुढे पातळी गेल्यास नदी-पात्रात पाणी सोडण्यात येणार..
या महिन्यात धरणातील पाणी पातळीत वाढ होण्याची ४२ वर्षातील पहिलीच वेळ.
बेंबळे प्रतिनिधी :- दत्तात्रय सुरवसे
पुणे जिल्हा, भीमाशंकरचे डोंगर, लोणावळा पश्चिम विभाग, तसेच मावळ भाग व उजनी जलाशयाच्या लाभक्षेत्र परिसरात १, २ व ३ डिसेंबर पासून होत झालेल्या संततधार अवकाळी पर्जन्यवृष्टीमुळे ४ डिसेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजल्यापासून, दौंड येथून उजनी धरणात १७ हजार ०४४ क्युसेक्स ची होणारी आवक काहीशी कमी होवून सोमवार दि. ६ रोजी ११ हजार ६४५ क्युसेक झाली असून उजनी जलाशयाच्या पाणीपातळीत २ टक्क्यांनी वाढ होवून एकूण जलसाठ्यात ४ टीएमसी ची वाढ होत जलसाठा १२१ टीएमसी झाला आहे.
४२ वर्षाच्या इतिहासातील पहिली घटना.....
विशेष असे की अनेक वेळा नोव्हेंबर-डिसेंबर (मराठी कार्तिक- मार्गशीर्ष ) महिन्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण व थोड्या प्रमाणात पाऊस होत असतो. त्यामुळे रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, मका, सूर्यफूल आदी पिकांना जिरायत भागात खूप मोठा दिलासा व आधार मिळतो, परंतु सध्या सर्वत्र होत असलेल्या सतंतधार अवकाळी पावसामुळे उजनी धरणाच्या पाणी पातळीत तीन ते चार टक्के वाढ होत आहे व पाणीसाठ्यात दोन ते अडीच टीएमसी वाढ होत आहे व ही धरणाच्या मागील ४२ वर्षाच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे असे जाणकार व्यक्तीकडून समजते.
जलाशयातून पाण्याचा उपसा करण्यात पुणे जिल्हा आघाडीवर......
१५ ऑक्टोबर २१ रोजी उजनी धरणातील जलाशयाची नियोजित पाणी पातळी १११.२३ टक्के होती व पाणीसाठा १२३.२८ टीएमसी होता. मागील दीड महिन्यानंतर म्हणजेच १ डिसेंबर २१ रोजी पाणी पातळी १०४ टक्के पर्यंत कमी झाली आहे व धरणातील पाणीसाठा ११९ टीएमसी पर्यंत पोहोचला आहे, एकुण चार टीएमसी पाणी कमी झालेले आहे. हे चार टीएमसी पाणी उजनी जलाशयातून मोठ्या प्रमाणावर खेचून घेउन उपसा झाल्यामुळेच कमी झाले आहे हे निश्चित. जलाशयातून पुणे, अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यातील अनेक उपसा सिंचन योजना व उद्योगधंद्यांना हे पाणी खेचून घेतले जात आहे. सखोल अभ्यास केल्यास सर्वात जास्त पाणी म्हणजे एकूण साठ्याच्या किमान ३५% ते ४०% टक्के पाणी एकट्या पुणे जिल्ह्यात शेती व उद्योगधंद्याच्या नावाखाली खेचून नेले जात आहे हे स्पष्ट दिसून येते.
११० टक्के च्या पुढे नदीपात्रात पाणी सोडणार...
.
जलाशयात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग चालूच राहिला व पाण्याची टक्केवारी ११० च्या पुढे जाऊ लागली तर सर्वत्र सतर्कतेचा इशारा देऊन धरणाच्या पाच ते सहा दरवाजातून किमान १० हजार क्युसेक पाणी नदीपात्रात सोडले जाईल. परंतु सध्याचा अवकाळी पाऊस अनिश्चित व अचानक होऊ लागलेला आहे त्यामुळे याची शाश्वती देता येत नाही. जलाशयामध्ये १११.२३ टक्के पाणीसाठा करण्यात येतो, म्हणून धरण नियंत्रण विभागाचे पाणीपातळीकडे अतिशय काटेकोर लक्ष आहे. जलाशयातून नदीपात्रात पाणी सोडण्याची वेळ येताच निश्चितपणे सर्वत्र अगोदर इशारा देऊन कळविण्यात येईल....
रावसाहेब मोरे
कार्यकारी अभियंता व उजनी धरण नियंत्रण विभाग भिमानगर

सोमवार दि.६ डिसेंबर रोजी उजनीची सायंकाळी ६ ची स्थिती......
एकुण पातळी - ४९७.१५५ मिटर
एकूण साठा - ३४३०.५२ दलघमी
एकूण साठा - १२१.१३ टीएमसी
उपयुक्त साठा - १६२७.७१ दलघमी
उपयुक्त साठा - ५७.४८ टीएमसी
टक्केवारी १०७.२८ टक्के
दौंड आवक - ११,६४५ क्युसेक्स