करमाळा-प्रतिनिधी - सिद्धार्थ वाघमारे
आदिनाथ साखर कारखाना सुरु करण्यासाठी सत्ताधारी संचालक मंडळाने सहीचे अधिकार न दिल्याने आदिनाथ बचाव समितीने कामकाज थांबवले आहे. अधिकार दिल्यास पुन्हा कारखाना सुरु करण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे अदिनाथ बचाव समितीने स्पष्ट केले आहे. आदिनाथ कारखाना सुरु करण्यासाठी आदिनाथ बचाव समितीने प्रयत्न सुरु केले. त्यानंतर बारामती ऍग्रोबाबतचा ठरावही रद्द करण्याबाबत निर्णय झाला. दरम्यान बारामती ऍग्रोचे आमदार रोहित पवार यांनी आम्हीच कारखाना सुरु करणार असं सांगितले होते. त्यात माजी आमदार जयवंतराव जगताप यांनीही भूमिका मांडली होती. पवारच हा कारखाना सुरु करू शकतील असे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर आदिनाथ कारखान्यातून दोन ट्रक साखर एमएससी बँकेने काढली होती. त्यानंतर आदिनाथ बचाव समिती काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यातच आदिनाथ बचाव समितीचे प्रमुख हरिदास डांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन रविवारी (ता. ३) भूमिका स्पष्ट केली आहे.
आदिनाथ बचाव समितीचे हरिदास डांगे म्हणाले, २०२२- २३ या गाळप हंगामात कारखाना सुरु व्हावा म्हणून राजकारणविरहीत आम्ही प्रयत्न सुरु केला होता. अनेक सभासदांनी त्याला चांगला प्रतिसादही दिला. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कारखाना सुरु करण्यासाठी काम सुरु करण्याचे अश्वासन दिले होते. मात्र आधिकार मिळाले नाहीत त्यामुळे कामकाज थांबवले जात आहे. अधिकार मिळाल्यास पुन्हा काम सुरु करु असे त्यांनी सांगितले आहे. आम्ही कारखाना सुरु करण्यासाठी प्रयत्न केले. १ रुपया मानधन देऊन कामकाज करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र तरीही प्रतिसाद मिळाला नाही. आमदार रोहित पवार यांनी काम सुरु करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. डांगे यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपाचेही स्पष्टीकरण दिले आहे.