टेंभुर्णी प्रतिनिधी नवनाथ नांगरे
रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल टेंभूर्णी मध्ये माजी विद्यार्थी मेळाव्या आयोजन प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना साहेबराव पवार यांनी शाळेच्या विकासात माजी विद्यार्थ्यांचे फार मोठे योगदान असते त्यांच्यामुळे शाळेच्या भौतिक सुविधांबरोबरच समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचण्यास पण मदत होते. त्यांची शाळेशी नाळ घट्ट जोडल्यानेच शाळेचा सर्वांगीण विकास होत असतो.शाळा इमारत बांधकामाच्या सुरुवातीच्या काळामध्ये आतार मामांनी जमीन शाळेस दान दिली आणि येवले कुटुंबीयांनी शाळेसाठी त्या काळामध्ये फार मोठी देणगी दिल्याने आणि त्या काळातील विद्यार्थ्यांनी श्रमदान केल्यामुळे ही रयतेची इमारत उभी राहिली आहे .असे गौरवोद्गार पवार सरांनी याप्रसंगी काढले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली .प्रशालेचे मुख्याध्यापक साहेबराव लेंडवे यांनी माजी विद्यार्थी मेळाव्याच्या आयोजनाबद्दलची भूमिका स्पष्ट करताना माजी विद्यार्थी एकत्र यावेत आणि विचारांची देवाण-घेवाण व्हावी, एकमेकांशी सुसंवाद साधला जावा, आणि शाळेशी ऋणानुबंध वाढावा.असे मत त्यांनी प्रास्ताविकात व्यक्त केले.याप्रसंगी शैक्षणिक विषयावर संवाद साधताना जलतज्ञ अनिल पाटील यांनी भविष्यकाळातील शिक्षणाच्या खाजगीकरणामुळे सर्वसामान्य पालकांना आपल्या पाल्यास शिक्षण देणे ही अवघड गोष्ट होणार आहे .तसेच शाळेच्या गुणवत्तेमध्ये वाढ करण्यासाठी आणि सॅकमध्ये चांगली ग्रेड मिळविण्यासाठी माजी विद्यार्थी संघटनेचे फार मोठे महत्त्व असते. म्हणून माजी विद्यार्थी संघटनेने शाळेच्या प्रत्येक गोष्टी मध्ये सक्रिय व्हावे असे आवाहन याप्रसंगी त्यांनी केले.

या कार्यक्रम प्रसंगी सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामध्ये रयतेच्या शाळेमुळे आम्ही कसे घडलो हे उदाहरणांसह सांगितले .या शाळेने आमच्यावर शिक्षणाबरोबरच संस्कारही केले आहेत त्यामुळे आम्ही विविध क्षेत्रात चांगल्या प्रकारची प्रगती करून शिकलो.या शाळेचे आमच्यावर फार मोठे ऋण आहेत आणि हे ऋण कदापी फिटणारे नाहीत .तरीसुद्धा या ऋणात राहून आमच्या परीने या शाळेसाठी आम्ही सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करू असे भावनिक उदगार माजी विद्यार्थ्यांनी काढले.या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात माजी विद्यार्थी सहभागी झाले होते .यामध्ये राजू शिंदे,अशोक जठार ,भारत बावळे, तानाजी निचाळ, पोपट शिंदे, धर्मराज कुटे, महेश यादव ,अंकुश चिंतामण ,शिवाजी भरगंडे,सुनील पाटील, संदीप खडके, विजय भरगंडे, अश्विन मुंडलिक, अजित मुंडलिक ,प्रताप साखरे ,संतोष भरगंडे, भगवंत देशमुख, अमर देशमुख ,नंदू परबत, गणेश कोरडे ,दिगंबर क्षीरसागर असे विविध क्षेत्रातील उत्तुंग असे कार्य करणारे माजी विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी प्रशालेचे माजी शिक्षक पोपट चव्हाण ,बिभीषण पाटील ,अजित काझी ,महादेव पवार देवेंद्र गोंजारी शिक्षकवृंद उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्यवेक्षक महादेव भुजबळ, शंभू शिंदे रामचंद्र खंडागळे यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामभाऊ लष्कर यांनी केले तर आभार प्रदर्शन भारत बावळे यांनी केले.