दौंड : परशुराम निखळे
दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील आनंद फॅक्टरी प्रकल्पात यांत्रिक मशीनच्या साहाय्याने खड्डे घेऊन रासायनिक घातक कचरा टाकून त्यावर मातीने बुजवला जात असल्याच्या प्रकार सतर्क नागरिकांनी गुरुवार (ता.२३) रोजी उघड केला असून याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली आहे. यामुळे कुरकुंभ एमआयडीसीमधील प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील अनेक प्रकल्प रासायनिक प्रक्रियेवर आधारित असल्याने रोज मोठ्या प्रमाणात रासायनिक घातक कचरा निर्माण होते. त्यामध्ये निर्धारित क्षमते पेक्षा अधिक रासायनिक उत्पादन घेण्यासाठी प्रकल्प चालक नियमबाह्य कामांना पसंती दिली जात असल्याने मोठ्या प्रमाणात घातक कचरा निर्माण होत आहे. हा रासायनिक घातक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा गंभीर प्रश्न या प्रकल्प चालकांपुढे पडलेला असतो. यामुळे बेकायदेशीर घातक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नवनवीन प्रयोग संबंधित प्रकल्प व्यवस्थापनाकडून केले जात आहे. आनंद फॅक्टरी प्रकल्पात यांत्रिक मशीनच्या साहाय्याने भूमिगत खड्डे घेऊन रासायनिक घातक कचऱ्यावर माती टाकली असल्याचे समोर आले आहे. एमआयडीसीमधील अज्ञात प्रकल्पाकडून रासायनिक घातक कचऱ्याची वाहतूक करून आनंद फॅक्टरीमध्ये बेकायदेशीर भूमिगत केला जात आहे. तसेच आनंद प्रकल्पाच्या दुसऱ्या युनिटमध्ये मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचा कचरा जमा केला आहे. यावेळी भूमिगत केलेला घातक कचरा कोणत्या अज्ञात प्रकल्पाचा आहे ? त्या प्रकल्पावर कारवाई होणार का ? कुरकुंभ एमआयडीसीमधील दर्शनी भागात फलक नसलेल्या प्रकल्पांवर योग्य कारवाई होणार का ? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
संबंधित प्रकल्पाच्या दर्शनी भागात प्रकल्पाचे नाव, उत्पादन, कच्चा माल, याबाबतचा माहिती फलक जाणीवपूर्वक उभा केला नसल्याने प्रकल्पात अनेक प्रकारचे बेकायदेशीर कामे केली जात असल्याचे आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. याबाबत आनंदा फॅक्टरी प्रकल्पाचे मालक चिराग पटेल यांना विचारले असता, प्रकल्पात घातक कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नसल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणाची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रताप जगताप यांनी असे सांगितले की, प्रदूषणाबाबत प्रकल्पाची हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. प्रदूषणाचे नियम मोडीत काढणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. तसेच भूमिगत केलेला कचरा बाहेर काढून संबंधित प्रकल्पावर योग्य कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले.
कुरकुंभ एमआयडीसी परिसरातील प्रकल्पांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची व कारवाईची भीती वाटत नसल्याने प्रकल्पाकडून सर्रासपणे प्रदूषण केले जात असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी नियम मोडीत काढणाऱ्या प्रकल्पावर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.
