latest

माझी वसुंधरा अभियानाच्या यशस्वीतेसाठी लोकसहभाग वाढवा - विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे प्रतिनिधी -: दि.16-माझी वसुंधरा अभियान 2.0 अंतर्गत निश्चित केलेल्या सर्व घटकांसंदर्भात चांगली कामगिरी करावी आणि अभियान यशस्वी करण्यासाठी व्यापक लोकसहभाग वाढवावा अशा सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे माझी वसुंधरा अभियान 2.0 संदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, सहआयुक्त पुनम मेहता, उप वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे,  यशदाचे उपसंचालक मल्लिनाथ कलशेट्टी, इकॉलॉजी सोसायटी विश्वस्त प्रा. गुरूदास नूलकर,  विभागीय माहिती उपसंचालक डॉ.राजू पाटोदकर आदी उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना श्री. राव म्हणाले, प्रत्येक घटकासंदर्भात असलेली आव्हाने लक्षात घेऊन अभियानाचे सूक्ष्म नियोजन करावे. नागरिकांना त्यांचे मूलभूत हक्क देण्याच्यादृष्टीनेही अभियान महत्वाचे असल्याने त्याकडे विशेष लक्ष द्यावे. स्वच्छ भारत अभियानापेक्षा हे अभियान अधिक व्यापक असल्याने नियोजनबद्ध पद्धतीने तयारी करावी. विद्युत वाहन निर्मात्यासोबत बैठकांचे आयोजन करून त्याबाबत जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. परिसरात झालेल्या वृक्षारोपणाची नोंद घेण्यासाठी विशेष मोहीम राबवावी आणि वृक्ष संवर्धनाचेही नियोजन करावे. जिल्हा परिषद स्तरावर अभियानाच्या नियंत्रणासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करावा आणि ग्रामीण भागातही शहराप्रमाणे जनजागृतीसाठी समाजमाध्यमांचा उपयोग करावा. अभियान जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाचे सहकार्य घेण्यात यावे.

गुणांकन वाढविण्याचा प्रयत्न

महिन्यातून एकदा हवेची गुणवत्ता तपासावी. पालापाचोळा किंवा शेतातील जैवकचरा जाळला जाऊ नये यासाठी प्रबोधनाचे उपक्रम राबवावे. जनतेला सायकल वापराबाबत प्रोत्साहित करावे आणि त्यासाठी सायकल रॅली, कार्यालयात वाहन विरहित दिवस निश्चित करून सायकलचा वापर करणे अशा उपक्रमांचे आयोजन करावे. पाचही घटकांच्या बाबतीत दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार गुणांकन वाढविण्याचा प्रयत्न करावा. अभियान शासनाचा पुढाकार आणि जनतेचा सहभाग अशा स्वरूपात पुढे न्यावे आणि त्यात समाजातील प्रत्येक घटकाचा समावेश करावा. चांगले काम करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील उपक्रम इतरही ठिकाणी राबवावे, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, जिल्ह्यातील सर्व नगर परिषदा, नगर पंचायती मध्ये माझी वसुंधरा अभियान राबविले जात आहे. पृथ्वी, जल, अग्नी, आकाश व वायू या पंचततत्वा नुसार विविध कार्यक्रम हाती घेण्यात आलेले आहेत.या अंतर्गत 48 हजार 131 वृक्षांची लागवड केलेली असून त्यातील 43 हजार 829 वृक्षाचे संवर्धन झालेले आहे. तसेच सर्व नगरपालिका क्षेत्रात हेरिटेज वृक्षाची गणना सुरू झालेली असून आत्तापर्यंत 544 वृक्ष हेरिटेज म्हणून नोंदवले असून त्यांचे जिओ-टॅगिंग केलेले आहे, असे त्यांनी सांगितले.

सोलापूर मनपा आयुक्त पी. शिवशंकर, सांगली जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह, पुणे मनपा अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार, सातारा मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सांगली मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, सोलापूर मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, कोल्हापूर सीईओ संजयसिंह चव्हाण, कोल्हापूर मनपा आयुक्त कादंबरी बलकवडे, सांगली मनपा आयुक्त नितीन कापडणीस, पिंपरी चिंचवड मनपा अभियान समन्वयक संजय कुलकर्णी यांनी अभियानांतर्गत केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.

श्रीमती मेहता यांनी सादरीकरणाद्वारे अभियानात विभागातील पाचही जिल्ह्यांच्या आतापर्यंतच्या गुणांकनाची माहिती दिली. प्रा.नूलकर यांनीदेखील यावेळी अभियानाबाबत मार्गदर्शन केले.

You've successfully subscribed to loksahyadri.com
Great! Next, complete checkout for full access to loksahyadri.com
Welcome back! You've successfully signed in.
Unable to sign you in. Please try again.
Success! Your account is fully activated, you now have access to all content.
Error! Stripe checkout failed.
Success! Your billing info is updated.
Error! Billing info update failed.