दै.लोक सह्याद्री ई न्युज..
मावळ प्रतिनिधी - रोहित चोपडे
कामशेत दि ३०: बँकेच्या हफ्तेवसुलीला कंटाळून चिखलसे येथील युवकाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मावळ तालुक्यात घडला आहे. गुरुवारी (दि.३०) चिखलसे येथील डोंगरातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह आढलून आला आहे.
प्रकाश तानाजी काजळे (वय ३१, रा. चिखलसे ) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी
कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश तानाजी काजळे या युवकाने एका बँकेचे क्रेडिट कार्ड वापरून साधारणतः १ लाख रुपयांची रक्कम खर्च केली होती. त्यामुळे क्रेडिट कार्डद्वारे खर्च केलेल्या पैशांची प्रकाश काजळे यासकडून वेळेत परतफेड न झाल्याने बँकेकडून पैसे भरण्यासाठी वारंवार फोन केले जात होते.त्यानंतर मंगळवारी (दि. २८) बँकेचे कर्जवसूली पथक घरी आल्याने प्रकाश घरातून निघून गेला ते सायंकाळ पर्यंत घरी परतला नाही. म्हणून त्यांच्या कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला मात्र प्रकाश मिळून न आल्याने त्याचे मोठे भाऊ विकास तानाजी काजळे यांनी प्रकाश हरविल्याची कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
गुरुवारी (दि.३०) चिखलसे येथील डोंगरातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत प्रकाश काजळे यांचा मृतदेह आढळून आला आहे. कामशेत पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आकाश पवार हे या संदर्भातील पुढील तपास करत आहेत.